
मुंबई : केंद्र सरकारच्या ‘परीक्षा पे चर्चा २०२६’ या उपक्रमांतर्गत राज्याला तब्बल ६५ लाख विद्यार्थी, शिक्षक व पालकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत केवळ २ लाख ७८ हजार ५३५ जणांनीच सहभाग नोंदवला असल्याचे स्पष्ट झाले असून, उर्वरित ६२ लाखांहून अधिक नोंदणी अवघ्या २० दिवसांत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे राहिले आहे.
‘परीक्षा पे चर्चा ९’ या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत १ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत
👉 https://innovateindia.mygov.in
या संकेतस्थळावर सहावी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या उपक्रमातून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. परीक्षेला कसे सामोरे जातात, अभ्यासाची पद्धत, तणावमुक्त तयारी यासारख्या विषयांवर ३०० शब्दांत निबंध सादर करायचा आहे.
प्रतिसाद अल्प, शिक्षण विभागाची धावपळ
इतक्या मोठ्या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने राज्याच्या शिक्षण विभागाची धावपळ सुरू झाली आहे. आतापर्यंत नोंदणीचे प्रमाण अत्यल्प असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील शाळांना ठराविक उद्दिष्टे देण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्य, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक व पालकांची नोंदणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याचा अहवाल थेट संचालनालयास सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
शिक्षकांवर वाढता ताण
राज्यात उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना, सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना हा उपक्रम बंधनकारक करण्याची वेळ विभागावर आली आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर
अभ्यासक्रम पूर्ण करणे
विद्यार्थ्यांची तयारी
ऑनलाइन नोंदणी व अहवाल
या तिहेरी जबाबदाऱ्यांमुळे शिक्षक अडचणीत सापडले असल्याचे चित्र आहे.
११ जानेवारी २०२६ पर्यंत ६२ लाखांहून अधिक नोंदणी पूर्ण होणार का? असा प्रश्न आता शिक्षण क्षेत्रात उपस्थित होत आहे.