MPSC Recruitment : स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी मोठी संधी! एमपीएससीकडून गट-अ, गट-ब परीक्षेची जाहिरात…

MPSC Recruitment : स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी मोठी संधी! एमपीएससीकडून गट-अ, गट-ब परीक्षेची जाहिरात जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांतील महत्त्वाच्या पदांची भरती केली जाणार आहे.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, ही पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी राज्यातील ३८ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३१ डिसेंबरपासून २० जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर चलनाद्वारे ऑफलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

८७ रिक्त पदांची भरती

या भरती प्रक्रियेतून सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग आणि वन विभागातील एकूण ८७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये –

  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ : १३ पदे

  • सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ : ३२ पदे

  • सहायक गट विकास अधिकारी गट-ब : ३० पदे

  • उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब : ४ पदे

  • पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ : ८ पदे

दरम्यान, उपजिल्हाधिकारी गट-अ या संवर्गासाठी अद्याप शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झालेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया

ही भरती प्रक्रिया पूर्व परीक्षा, मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पूर्व परीक्षेतील गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी वापरले जातील. अंतिम निकालात पूर्व परीक्षेचे गुण धरले जाणार नाहीत. मुख्य परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

पदसंख्येत बदलाची शक्यता

शासनाकडून नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांनुसार पदसंख्या, सेवा, संवर्ग तसेच आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचे एमपीएससीने नमूद केले आहे. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरातीतील सर्व अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

👉 अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, पात्रता व आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.