तुळजापूरमध्ये निवडणूक निकालाआधीच तणाव; राजकीय वादातून हाणामारी, युवक गंभीर जखमी

तुळजापूर | प्रतिनिधी

निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच तुळजापूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मंगळवारी दुपारी शहरात मोठा गोंधळ उडाला.

भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये झालेल्या वादाने अचानक उग्र रूप धारण करत थेट हाणामारीत रूपांतर केले. या घटनेत कुलदीप मगर नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून तो महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांचा पुतण्या असल्याची माहिती आहे.

मंगळवारी  दुपारच्या सुमारास नळदुर्ग रोड परिसरात दोन राजकीय गटांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हात उगारण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची बातमी पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली.परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या गोंधळामुळे नळदुर्ग रोडवरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती.

तणावपूर्ण वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला. जखमी कुलदीप मगर यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे तुळजापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.