लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ. पती/वडील नसलेल्या, विधवा, घटस्फोटित महिलांसाठी अंगणवाडी सेविकेद्वारे OTP शिवाय ई-KYCची सुविधा.

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. अनेक महिला पती, वडील किंवा मुलाच्या आधार क्रमांकावरील ओटीपी उपलब्ध नसल्याने अडचणीत होत्या. परंतु, आता अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतीला येणार आहे. महिलांना आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करून ई-केवायसी करता येईल. राज्य शासनाने लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली. या मदत वाटपासोबत काही बदलही केले जात आहेत. यातूनच आता ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
ही ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना स्वतःचे आधार कार्ड द्यावे लागते. त्यानंतर काहीप्रश्न विचारले जातात. त्यासोबत आधार कार्डमधले नाव वडिलांचे असेल तर वडिलांचे आधार कार्ड किंवा पतीचे नाव असेल तर पतीचे आधार कार्ड द्यावे लागते. दरम्यान, ज्या लाडक्या बहिणीचे पती अथवा वडील वारले आहेत, त्यांना आधार कार्डच देता येत नव्हते. यामुळे ई-केवायसी प्रक्रियाच होत नव्हती. यासाठी आता अंगणवाडीताई स्वतः शहानिशा करून शिफारसपत्र देणार आहेत. त्यासाठी लाडक्या बहिणींनी अंगणवाडीताईकडे मृत्यूचा दाखला द्यावा लागणार आहे. त्यानंतर अंगणवाडीताई हे शिफारसपत्र देणार आहेत. त्यामुळे अंगणवाडीताईची जबाबदारी वाढणार आहे
नंतरच होणार बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची मंजुरी
अंगणवाडीताईंनी स्वाक्षरी केलेले शिफारसपत्र दिल्यानंतरच हे शिफारसपत्र बालविकास प्रकल्प कार्यालयात सादर केले जाणार आहे. त्यानंतर महिला व बालकल्याण विभाग ई-केवायसी प्रक्रियेमधून संबंधित लाडक्या बहिणीला सूट मिळणार आहे.
अनेक बहिणींना सुधारित नियमाची माहितीच नाही ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यासोबतच ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत, त्यांना सुधारित सूचना अमलात आणायच्या आहेत. त्यासाठी अध्यादेशही निघाला आहे. मात्र, या अध्यादेशाची माहिती अनेक लाडक्या बहिणींना नसल्याचे समोर येत आहे.
विधवा, घटस्फोटित महिलांना हा दिलासा
- शासनाने विधवा, घटस्फोटित महिलांनाही दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
- अशा महिलांनी पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत अंगणवाडीताईकडे जमा करणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी सेविका या कागदपत्रांची तपासणी करून बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे शिफारस करतील.
‘या’ कागदपत्रांवरून करा ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड व त्यासोबत लिंक असलेला मोबाइल सोबत ठेवणे आवश्यक आहे.
31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीला मुदत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. तांत्रिक अडचणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.