प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. 6 : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) या दोन्ही परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेबाबतची सविस्तर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

शासनमान्य शाळांमधून 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी, तर इयत्ता सातवीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असतील. अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी व पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेकडून शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब, अतिविलंब व अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत संधी देण्यात आली आहे.

यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शाळा प्रशासनाने दिलेल्या कालमर्यादेतच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या परीक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक सहाय्य देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असेही परीक्षा परिषदेकडून कळवण्यात आले आहे.