प्रचार रॅलीदरम्यान एमआयएम उमेदवारावर हल्ला; व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये एमआयएमकडून उमेदवारी मिळालेल्या मोहम्मद असरार यांनी प्रचारासाठी रॅलीचे आयोजन केले होते. मात्र प्रचार सुरू असतानाच अचानक अनपेक्षित प्रकार घडला. पक्षातीलच काही असंतुष्ट कार्यकर्त्यांनी रॅलीदरम्यान मोहम्मद असरार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

भर रस्त्यात सुरू असलेल्या रॅलीमध्ये झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. काही वेळासाठी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या घटनेमुळे निवडणूक प्रचाराच्या काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांची वेळीच मध्यस्थी घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून तणाव निवळला आहे. मात्र, उशिरापर्यंत या भागात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच पक्षात झालेल्या या बंडखोरीमुळे एमआयएमसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.