Sarfaraz Khan: आयपीएल २०२६ मिनी लिलावात सर्फराझ खानला चेन्नई सुपर किंग्स संघाने बोली लावत संघात सामील केलं. यानंतर सर्फराझने भावुक करणारं वक्तव्य केलं आहे.

आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव अबूधाबीमध्ये पार पडला. या लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लावली. याशिवाय गेल्या हंगामांमध्ये अनसोल्ड राहिलेले खेळाडू आगामी हंगामात खेळताना दिसणार आहेत. यादरम्यान आक्रमक फलंदाज सर्फराझ खान याच्यावर बोली लावत चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला ताफ्यात सामील केलं. यानंतर सर्फराझने भावुक करणारं वाक्य लिहिलं.
लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर टीम इंडियाचा फलंदाज सर्फराझ खानला चेन्नई सुपर किंग्जने एक्सिलरेटेड राउंडमध्ये खरेदी केलं. सीएसकेने त्याला त्याच्या ७५ लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये विकत घेतलं. लिलावात चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केल्यानंतर सर्फराझ खान खूप आनंदी दिसत होता आणि भावुकही झाला.
पहिल्या फेरीत सर्फराझ खानवर कोणीच बोली लावली नाही, पण नंतर चेन्नई सुपर किंग्जने अखेरच्या राऊंडमध्ये त्याला विकत घेतलं. सीएसकेने त्याला लिलावात खरेदी केल्यानंतर, सर्फराझने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिलं, “मला नवं आयुष्य दिल्याबद्दल सीएसकेचे खूप आभार.” गेल्या दोन लिलावांमध्ये सर्फराझ खान अनसोल्ड राहिला होता.
सर्फराझ खानने २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. तो यापूर्वी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे.
त्याने आतापर्यंत लीगमध्ये ५० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २२.५० च्या सरासरीने ५८५ धावा केल्या आहेत. तो सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. यामध्ये त्याने अलीकडेच राजस्थानविरुद्धच्या सामन्यात २२ चेंडूत ७३ धावांची वादळी खेळी केली.