BMC Election 2026: ज्यांना आधी मुंबई पाहिजे होती, अशा लोकांचे आज पुन्हा मुंबईचे लचके तोडण्याच मनसुबे आहेत. त्यामुळे आता आपण भांडत राहिलो तर आधीच्या लोकांनी केलेल्या संघर्षाचा आणि हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आज दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचा समाचार घेतला आणि मुंबई-महाराष्ट्रावर कोणी वाकड्या नजरने पाहिलं किंवा त्यांच्या कपटी-कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असं म्हणत ठाकरेंनी आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमच्या दोघांचेही आजोबा, प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या पाच सेनापतींपैकी एक होते. तसंच बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांच्यासह अख्खं ठाकरे घराणं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात संघर्ष करत होतं. मात्र मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर जेव्हा उपरे मराठी माणसाच्या उरावर नाचायला लागले तेव्हा न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ज्यांना मुंबई पाहिजे होती, त्यांचे आज पुन्हा मुंबईचे लचके तोडण्याच मनसुबे आहेत. त्यामुळे आता आपण भांडत राहिलो तर हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल. त्यामुळे आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत.”
उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रासाठी संदेश
मनसेसोबतच्या युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे जनतेला आवाहन करत म्हणाले, “आमच्या युतीबाबत उत्साह अमाप आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर आज संपूर्ण देश बघतोय. मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतोय, कारण विधानसभेच्या वेळी भाजपने जसा एक अपप्रचार केला होता की बटेंगे तो कटेंगे, तसं आता मी मराठी माणसांना सांगतोय, आता चुकाल तर संपाल. आता जर फुटाल तर पूर्ण संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका, असा संदेश आज मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देत आहे,” असं आवाहन ठाकरे यांनी केलं.
दरम्यान, “मला खात्री आहे की, मराठी माणूस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही, पण त्याच्या वाट्याला कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.