
Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करते. विधानसभा निवडणुकीदरम्यान, आम्ही सत्तेत आलो तर महिलांना दिली जात असलेली ही मदत वाढवण्यात येईल. पात्र महिलांना 2100 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील, असे आश्वानस महायुतीने दिले होते.
सध्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे. परंतु अद्याप लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळतात. दरम्यान, आता याच लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या वाढीबाबत मोठे आणि महत्त्वाचे भाष्य केले. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
विरोधकांचा हल्लाबोल, फडणवीसांचेही उत्तर
नागपुरात सोमवारपासून चालू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विरोधकांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सध्या राज्यात शेतकरी त्रस्त आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, बेरोजगारीचाही मुद्दा आहे, असा हल्लाबोल करता यावेळचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत विरोधकांनी दिले. तर विरोधकांच्या या पत्रकार परिषदेलाही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच उत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार केला. आम्ही विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ. विरोधकांची पत्रकार परिषद ही निराशेने भरलेले होती, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले,“योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. काळजी करू नका.” या विधानामुळे तातडीने 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी दिसत असली, तरी भविष्यात लाभ वाढू शकतो, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेतही विरोधकांनी दिले आहेत. शेतकरी प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होणार असून, सरकारनेही उत्तरे देण्याची तयारी दाखवली आहे.