धाराशिव नगरपालिकेतील तीन प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या – सुधारित वेळापत्रक जाहीर!

धाराशिव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी छाननीच्या वेळी अर्ज वैध-अवैध ठरविल्याच्या कारणावरून तीन प्रभागातील उमेदवार न्यायालयात गेले होते. त्यांच्या प्रकरणाची सुनावणी विहित वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी या तिन्ही प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याच्या सूचना पालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

धाराशिव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी व ४१ नगरसेवक पदांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. छाननीदरम्यान, शहरातील प्रभाग क्रमांक २ अ, ७ ब व १४ ब या प्रभागातील अर्जाच्या वैध-अवैधतेवरून वादंग झाले. यामुळे संबंधित आक्षेपकर्त्यांनी व उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या प्रकरणावर चिन्ह वाटपापूर्वी निर्णय अपेक्षित होते. मात्र, विहित वेळेत न्यायालयीन आदेश प्राप्त न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी २६ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही मार्गदर्शन मागवले. त्यास आयोगाने संबंधित प्रभागातील निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याच्या सूचना केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या निवडणुका स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयीन अपीलमुळे स्थगित झालेल्या धाराशिव नगरपालिकेतील प्रभाग क्र. २ अ, ७ ब आणि १४ ब यांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

महत्त्वाच्या तारखा:

  • निवडणूक कार्यक्रम जारी: ०४ डिसेंबर २०२५

  • नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख: १० डिसेंबर २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)

  • अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: ११ डिसेंबर २०२५

  • मतदान (आवश्यक असल्यास): २० डिसेंबर २०२५ (७.३० ते ५.३०)

  • मतमोजणी व निकाल: २१ डिसेंबर २०२५ (सकाळी १० वाजल्यापासून)

धाराशिव नगरपालिकेतील स्थगित प्रभागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या तीन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. उर्वरित जागांवर मतदान नियोजित वेळाप्रमाणे २ डिसेंबर रोजी होईल.